प्रभात वृत्तसेवा पुणे – एबी फाॅर्म मिळाल्याने छाननीत अनेक उमेदवार पास झाले; परंतु अजूनही मित्रपक्षांचा आपापसांतील घोळ मिटत नसल्याने त्यांना पक्षाच्या पातळीवर नापास होण्याची भीती असून, माघार घ्यावी लागते की काय, याची त्यांना धाकधूक लागली आहे.प्रत्येक पक्षाने भारंभार एबी फाॅर्म वाटले आहेत. त्याचा पायपोसही कोणाला नसल्याने किती जणांना एबी फाॅर्म दिले, याची गणतीच कोणत्या पक्षाने नीट ठेवली नाही. नेत्यांकडे कोरे एबी फाॅर्म दिले आणि त्यांनी ते वाटले. कोणाला दिले, किती दिले, समोर आपल्याच मित्रपक्षातील उभा ठाकला आहे का, एकाच उमेदवाराला दोन पक्षांतून एबी फाॅर्म दिले गेले, अशा एक ना अनेक तक्रारी प्रत्येक पक्षाकडे करण्यात आल्या.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपापसांत हे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाने तातडीने बैठक बोलावली आणि त्यांच्या बाजूने हा प्रश्न सोडविल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोणाकोणाला अर्ज मागे घ्यायला लागणार, हे तीन तारखेला समजणार आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणाला माघार घ्यायला लागणार, हे आता शनिवारीच स्पष्ट होणार आहे. मनधरणी आणि प्रलोभने एवढ्या कष्टाने आपण एबी फाॅर्म मिळवला आहे आणि नेमकी आपल्यालाच माघार घ्यावी लागली तर, अशी धाकधूक अनेक उमेदवारांना लागली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांची मनधरणीही पक्षाकडून केली जात आहे. त्यांना विविध प्रलोभनेही पक्षाने दिली आहेत. केवळ एबी फाॅर्म देताना झालेल्या गोंधळांमुळे ही सगळी परिस्थिती उद्भवल्याची चर्चा पक्षातील अंतर्गत वर्तुळात सुरू आहे.