प्रभात वृत्तसेवा पुणे – दुबार मतदानाचा मुद्दा देशभर गाजत असताना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी खबरदारी घेतली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत सुमारे तीन लाख इतके दुबार मतदार आहेत. मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे ओळखून त्यांच्या नावापुढे दुबार मतदार अशी नोंद करण्यात येणार आहे. तसेच, दुबार मतदार मतदानासाठी आल्यास इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाते, अनेक वेळा एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी दोनदा (दुबार) नोंदवले जाते. दुबार नावांमुळे निवडणुकीच्या वेळी बनावट मतदानाची शक्यता वाढते आणि यादीची विश्वासार्हता कमी होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार नावे आढळल्यास अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर आदेश सर्व महापालिका आयुक्त यांना दिले होते. पुणे महापालिका हद्दीत 41 प्रभागांमध्ये एकूण सुमारे 35 लाख इतके मतदार आहेत. मतदारांची पडताळणी केली असता त्यामध्ये सुमारे तीन लाखांइतके दुबार मतदार आढळून आले आहेत. दुबार मतदाराच्या नावासमोर डबल स्टार असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. जर दुबार मतदाराने कोणत्या वॉर्डमध्ये मतदान केले आहे, याची माहिती दिली नसल्यास असा दुबार मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यास ज्या दुबार मतदाराकडून इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबतचे हमीपत्र घेतले जाणार आहे. दुबार मतदारांकडून हमीपत्र घेताना त्यामध्ये मी नेमून दिलेल्या मतदान केंद्राशिवाय इतर कोणत्याही मतदान केंद्रांवर मतदान करणार नाही. जर या नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असेल, याची मला पूर्ण जाणीव आहे, अशा आशयाचे हमीपत्र घेतले जाणार आहे. दुबार मतदारांना दोनपैकी कोणत्या वॉर्डात मतदान करणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांना आधी द्यावी लागणार आहे. ज्या ठिकाणी मतदान करणार आहे, त्याबाबतचे पत्र संबंधित दुबार मतदारांकडून घेतले जाणार आहे. त्या मतदाराला त्याच मतदान केंद्रांवर मतदान करता येणार आहे. अन्य दुसऱ्या ठिकाणी मतदान करता येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.