PMC Election: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २० मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रितम नागपूरे, गौरव घुले, अस्मिता शिंदे आणि रश्मी आमराळे यांनी जनसंपर्क मोहिमेचा धडाका लावला आहे. गेल्या दोन दिवसांत बिबवेवाडी गावठाण परिसरासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. गावठाणात जंगी स्वागत – ५ जानेवारी रोजी संध्याकाळी बिबवेवाडी गावठाण आणि रम्यनगरी सोसायटी परिसरात भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावठाण परिसरातील मूळ रहिवाशांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले. “गावठाणातील संस्कृती जोपासत या भागाचा आधुनिक विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिले. यावेळी दादासाहेब लाठे, दिलीप बिबवे, विकी गव्हाणे, बबलु बागवान, रुपेश समेल आणि हेमंत परदेशी यांसह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सोसायट्यांमध्ये ‘डिजिटल बिबवेवाडी’वर भर – मंगळवार, ६ जानेवारी रोजी सकाळी उमेदवारांनी परिसरातील प्रमुख सोसायट्यांचा दौरा केला. यामध्ये प्रामुख्याने सुपार्श्वनाथ सोसायटी, मेघस्पर्श, माणिकमोती, क्षितिज आणि विद्याश्री सोसायटी मधील रहिवाशांच्या भेटी घेतल्या. सोसायट्यांच्या अंतर्गत समस्या आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी ‘डिजिटल व सुरक्षित बिबवेवाडी’ करण्याचा आपला संकल्प जाहीर केला. उमेदवारांच्या सुशिक्षित आणि अभ्यासपूर्ण भूमिकेचे सोसायट्यांमधील मतदारांनी विशेष कौतुक केले. विजयाचा निर्धार – या प्रचार दौऱ्यात हेमंत नाईकवाडी, कमलेश बेताला, प्रतिक कोळी, सिद्धार्थ नरवडे आणि मुन्ना पारखी यांसारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विजयाचा निर्धार व्यक्त केला. सध्या प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आक्रमक प्रचारामुळे आणि सर्व स्तरांतून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे निवडणुकीचे पारडे ‘घड्याळा’च्या बाजूने झुकल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.