प्रभात वृत्तसेवा पुणे – पुण्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून महापालिका निवडणुका मनसेच्या तिकिटावर लढण्यासाठी तयार असलेल्या इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. शुक्रवारी पहिल्याच दिवशी मनसेचे सुमारे ४०९ अर्ज कार्यकर्त्यांकडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेकडूनही लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तयार असल्याचे चित्र आहे.मनसेच्या स्थापनेनंतर २००७ च्या निवडणुकीत मनसेचे अवघे ७ नगरसेवक होते. तर २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत मनसेने थेट २८ नगरसेवक निवडून आणत महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेतले होते. त्यानंतर मात्र, २०१७ मध्ये मनसेचे अवघे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे, मनसेला मोठा फटका बसला होता. तर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही पक्षाच्या उमेदवारांना कमी मते मिळाली होती. त्याच वेळी या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मनसे महाविकास आघाडीसोबत जाईल, असे संकेत असतानाच मनसेकडून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुण्यातही दोन्ही पक्षांची रविवारी अनौपचारिक बैठक होणार आहे. त्यामुळे, दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्याच वेळी मनसेकडून महापालिका निवडणुकीसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल ४०९ अर्ज कार्यकर्त्यांनी घेतले आहेत. अर्ज वाटपाचा आज (शनिवारी) शेवटचा दिवस असून येत्या सोमवारी (दि. १५) सर्व इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.