प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकांची प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण आणि आता मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर आता निवडणूक घोषणांची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे अनेक इच्छुकींनी प्रभाग निश्चित करत बोर्ड, बॅनर्स, फ्लेक्सच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, असे असले तरी कोणत्याही राजकीय पक्षांकडून बैठका, कार्यकर्ते मेळावे किंवा निवडणुकीची नियमित प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामुळे तिकिट मिळणार की नाही? याचा उमेदवारांना अंदाज येईनासा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांची मोठी कोंडी झाली आहे.त्यातच पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडूनही स्पष्ट संकेत मिळत नाहीत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, तुम्ही तयारी ठेवा; तिकिट मिळाले नाही तर पक्ष सांगेल त्या उमेदवारासाठी काम करा, एवढेच आदेश दिले जात असल्याने इच्छुक संभ्रमात पडले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची न्यायालयातील सुनावणी आणि संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठीच पक्ष उशीर करत असल्याचे बोलले जात आहे.भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या आहे. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडेही तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. काँग्रेसमध्येही अनेक जुने नेतेच तिकिटासाठी इच्छूक आहेत. तर दोन्ही शिवसेना आणि मनसेत निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बांधणीचे काम हाती घेतल्याने तयारी निवडणुकीची की संघटना बांधणीची? असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. नेत्यांचे दौरे घटले न्यायालयाने जानेवारी २०२६ अखेर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व नेत्यांनी तातडीने आढावा बैठका घेतल्या होत्या. कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत किती जागा मिळतील?, पक्षाची स्थिती काय आहे?, निवडणूक स्वबळावर लढवायची की महायुती, महाविकास आघाडीत? यावर चर्चा झाली. या बैठकींना माजी नगरसेवक, संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती जास्त होती. त्यावेळी नेत्यांची भेट होत असल्याने कार्यकर्तेही चार्ज झाले होते. आता नेत्यांचे दौरेही थांबले आहेत. त्यानंतर प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण आणि प्राथमिक मतदार याद्या जाहीर झाल्या तरी फक्त दोन-तीन पक्षांनीच इच्छुकांची नावे मागविली आहेत. इतर कोणत्याही पक्षांकडून निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आपले काय होणार याबाबत इच्छुकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. इतर पक्षांकडेही चाचपणी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची असा निश्चय केलेल्या अनेक इच्छुकांनी आपल्या पक्षाबरोबरच इतर पक्षांमध्येही तिकिटासाठी चाचपणी सुरू आहे. जाहीर कार्यक्रम, जाहिराती किंवा बॅनर्समधून कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्यांचे फोटो न वापरण्याचा कल वाढला आहे. प्रभागात आयोजित कार्यक्रमांनाही कोणत्याही एकाच पक्षाच्या नेत्यांना न बोलावता उमेदवार स्वतःच कार्यक्रम पार पाडत असल्याचे चित्र आहे.