पुणे : तुम्ही अशा माणसाला निवडून द्या, ज्याच्या घरी किंवा ऑफिसला तुम्हाला जाता येईल. काँग्रेसला मत म्हणजे शांततेला मत असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले. भाजपला मत देणे म्हणजे गुंडशाहीला मत देणे होय, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ मधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश रमेश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारासाठी आज पुण्यातील हरकानगर काशेवाडी येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सफाई कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस आवाज उठविणार असल्याचेही स्पष्ट केले. काशेवाडी आणि हा पूर्ण परिसर काँग्रेस पक्षाचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वाधिक मताधिक्क्याने या प्रभागातील काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार विजय होतील, असा विश्वास माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला. जेष्ठ नेते चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, विठ्ठल थोरात, यासेर बागवे, दयानंद अडागळे, रशीद खिजर, हुसेन शेख,राजू मोरे, मोहन माने, दिलीप कांबळे व परिसरातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.