पुणे : पावसाळ्यात चौधरीनगर, मुंजाबा वस्ती परिसरात ड्रेनेज, तसेच पावसाच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्रभाग क्रमांक १ (कळस-धानोरी- लोहगाव उर्वरीत)चे भाजप महायुतीचे उमेदवार अनिल ( बाॅबी) वसंतराव टिंगरे यांनी सोमवारी मतदारांना दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील चौधरीनगर आणि मुंजाबा वस्ती परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, तसेच नागरिक उपस्थित होते. या वेळी अनिल बॉबी वसंतराव टिंगरे (बॉबी दादा) यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या सोडविण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. या पदयात्रेवेळी प्रभागातील नागरिकांनी रस्त्यांची खराब अवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, ड्रेनेज, स्वच्छता, तसेच पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी मांडल्या. दादांनी प्रत्येक समस्या शांतपणे ऐकून घेत तत्काळ उपाययोजना आणि दीर्घकालीन विकास आराखड्याबाबत माहिती दिली. विशेषतः मुंजाबा वस्ती भागात ड्रेनेज व पाणी साचण्याच्या प्रश्नावर प्राधान्याने काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय चौधरीनगर परिसरात रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद असून, प्रत्येक वस्तीपर्यंत विकास पोहोचवणे हेच माझे ध्येय असल्याचे या वेळी टिंगरे यांनी मतदारांशी बोलताना स्पष्ट केले.