पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत (PMC Election) यंदा अनेक प्रभागांमध्ये चुरशीचे आणि प्रतिष्ठेचे मुकाबले रंगणार आहेत. काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक थेट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तर काही प्रभागांमध्ये पक्षांतर करून बंडखोरी केलेल्या उमेदवारांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. एकूण १५ हून अधिक प्रभागांमध्ये तुल्यबळ उमेदवारांमधील लढतीमुळे मतदारांना रोमांचक सामन्यांचा अनुभव मिळणार आहे. मुख्यतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यातील थेट टक्कर दिसून येत असली, तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (शिंदे गट), मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही काही ठिकाणी लढत त्रिकोणी किंवा बहुरंगी करत आहेत. प्रमुख चुरशीच्या लढती प्रभाग ५ (कल्याणीनगर – वडगावशेरी):भाजपचे माजी नगरसेवक नारायण गलांडे आणि राष्ट्रवादीचे सचिन भगत यांच्यात मोठी लढत अपेक्षित आहे. दोघांचाही या भागात चांगला प्रभाव आहे. प्रभाग ७ (गोखलेनगर – वाकडेवाडी): भाजपच्या रेश्मा भोसले आणि राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट यांच्यातील मुकाबला चुरशीचा होणार आहे. प्रभाग ८ (औंध – बोपोडी): भाजपचे सनी निम्हण आणि राष्ट्रवादीचे प्रकाश ढोरे यांच्यात राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही उमेदवारांचा स्थानिक पातळीवर मजबूत आधार आहे. प्रभाग ९ (सूस – बाणेर – पाषाण): येथे दोन रोमांचक लढती आहेत. एकीकडे भाजपचे गणेश कळमकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे, तर दुसरीकडे भाजपचे लहू बालवडकर आणि राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर या दोन युवा नेत्यांमध्ये सत्तेचा थेट संघर्ष रंगणार आहे. प्रभाग १२ (शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी): भाजपच्या निवेदिता एकबोटे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे. प्रभाग १४ (कोरेगाव पार्क – मुंढवा): येथे त्रिकोणी लढत होणार आहे. भाजपचे उमेश गायकवाड, राष्ट्रवादीचे सुनील ऊर्फ बंडू गायकवाड आणि मनसेचे बाबू वागस्कर यांच्यात चुरस लागेल. प्रभाग १८ (वानवडी – साळुंखेविहार): काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि भाजपचे अभिजित शिवरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. प्रभाग २४ (कसबा पेठ – कमला नेहरू रुग्णालय परिसर): भाजपचे गणेश बिडकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे प्रणव धंगेकर यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला अपेक्षित आहे. प्रभाग ३६ (सहकारनगर – पद्मावती): येथेही दोन रोमांचक लढती. राष्ट्रवादीचे सुभाष जगताप विरुद्ध भाजपच्या वीणा गणेश घोष, तर दुसऱ्या पॅनेलमध्ये भाजपचे महेश वाबळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे आबा बागूल यांच्यात जोरदार टक्कर होईल. प्रभाग ३८ (बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज) : एकीकडे राष्ट्रवादीचे दत्तात्रेय धनकवडे आणि भाजपचे संदीप बेलदरे यांच्यात चुरस, तर दुसऱ्या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश कदम, ठाकरे सेनेचे वसंत मोरे, शिंदे सेनेचे स्वराज बाबर आणि भाजपचे व्यंकोजी खोपडे यांच्यात बहुरंगी सामना रंगणार आहे. प्रभाग ४० (कोंढवा बुद्रूक – येवलेवाडी): भाजपच्या रंजना टिळेकर आणि राष्ट्रवादीचे गंगाधर बधे यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळेल. प्रभाग २३ (नाना पेठ – रविवार पेठ) : शिवसेने च्या प्रतिभा धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांच्यात महिलांच्या प्रतिष्ठेची लढत होणार आहे. या लढतींमुळे पुणे महापालिका निवडणूक अत्यंत रंजक आणि निकराची होणार आहे. माजी नगरसेवकांच्या आमने-सामने येण्यामुळे जुने वैर आणि नवे समीकरणे समोर येत असून, बंडखोर उमेदवारांनीही अनेक प्रभागांमध्ये लढत त्रिकोणी किंवा चौरंगी करून मतविभागणीची शक्यता वाढवली आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.