प्रभात वृत्तसेवा पुणे – विकासकामांना धर्म नसतो आणि भाजपने नेहमीच ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर काम केले आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्चना पाटील यांच्यासारख्या कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे हाजी अरफात शेख यांनी स्पष्ट केले. काशेवाडी व डायसप्लॉट परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते. मुस्लिम समाजाने विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत अर्चना पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायसप्लॉट) येथील भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या उपस्थितीत सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला स्थानिक मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे आणि मुस्लिम समाजाकडून व्यक्त झालेल्या सकारात्मक भूमिकेमुळे अर्चना पाटील यांना अल्पसंख्याक समाजाचाही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. समाजातील विविध घटकांचा, विशेषतः अल्पसंख्याक समाजाचा वाढता पाठिंबा त्यांच्या विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.