प्रभात वृत्तसेवा पुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रणशिंग फुंकत पुणे शहरातील इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटपाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत ७५ इच्छुकांनी अर्ज नेल्याची माहिती शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने पुणेकरांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे. भ्रष्टाचार, अनियमित कारभार, सत्ताधाऱ्यांची जनविरोधी भूमिका याविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठविणारा एकमेव पक्ष म्हणून पक्षाने शहरात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने इच्छुक असून, त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यासाठी दि. ४ डिसेंबर रोजी प्रतीकात्मक चार उमेदवारांना अर्ज देऊन अर्ज वाटपाला सुरुवात केली.दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर अर्ज वाटपाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ७५ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. दि. ११ डिसेंबरपर्यंत अर्ज घेऊन जाण्याची मुदत असून, त्यानंतर संबधित अर्जदार इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. दरम्यान, या अर्जामध्ये इच्छुकांचे शिक्षण, सामाजिक काम, शैक्षणिक योगदान, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग, बैठकींतील उपस्थिती, प्रभागातील उपक्रम अशी सविस्तर माहिती भरून घेण्यात येणार आहे. त्यानुसार मुलाखतीच्या वेळा आणि कोणाच्या उपस्थितीत मुलाखती होणार, याच्या नियोजनासाठी शहरप्रमुख यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. पक्षाकडून त्याचे वेळापत्रक येणार असून, त्यानंतर मुलाखतींची तारीख जाहीर केली जाईल, असे शहरप्रमुखांनी सांगितले.