पुणे : पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. आज प्रभागात कार्यकर्त्यांसह भव्य प्रचार फेरी काढून घरोघरी संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या प्रचार रॅलीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचार फेरीत प्रभागातील भाजपाचे अधिकृत उमेदवार मानसी मनोज देशपांडे, राजेंद्र यशवंत शिळीमकर, महेंद्र माणिकचंद (मुथा) सुंदेचा आणि तन्वी प्रशांत दिवेकर सहभागी झाले होते. उमेदवारांनी प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आतापर्यंत महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. यामध्ये रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाइट्स, उद्याने, सामाजिक सभागृहे तसेच मूलभूत नागरी सुविधा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यात आला. यावेळी उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. प्रचारादरम्यान नागरिकांनी देखील आपल्या परिसरातील प्रश्न, पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत उमेदवारांसमोर मते मांडली. उमेदवारांनी निवडणुकीनंतर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण घोषणांमुळे आणि नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक २० मधील लढत चुरशीची होत असल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासन हे मुद्दे केंद्रस्थानी असून, भाजप–रिपाई महायुती या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या प्रचारातून स्पष्ट झाले आहे.