पुणे : प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपच्या पॅनलमधील उमेदवार महेश (ऊर्फ) अमर विलास आवळे यांनी शनिवारी प्रभागातील भेटीगाठींवर भर दिला. या वेळी त्यांच्यासोबत याच प्रभागातील उमेदवार आणि पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. शनिवारनिमित्त सकाळी हनुमानाचे दर्शन घेऊन भेटीगाठींना सुरुवात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नवी पेठ- पर्वतीचा भाग भाजपाच्या सर्व उमेदवारांनी पिंजून काढला आहे. सकाळच्या वेळी भेटीगाठी आणि संध्याकाळी पदयात्रा सुरू आहेत. पदयात्रांना मोठा प्रतिसाद मिळत असून, तरुण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहेत. पदयात्रांवेळी वेगवेगळ्या ठिकाणी महिलांकडून सर्वांचे औक्षण करून स्वागत करण्यात येते. शनिवारी सकाळी नवी पेठ परिसरातील रामबाग कॉलनी येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. त्यानंतर पर्वती दर्शन भागातील एसबीआय कॉलनीतील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या सर्व ठिकाणी स्थानिक नागरिकांनी विविध नागरी प्रश्न उमेदवारांच्या कानावर घातले आणि निवडून आल्यावर ते प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या आपुलकीने अमर आवळे यांच्या सामाजिक कामांची विचारपूस केली.