PMC Election: महापालिका निवडणूक प्रचाराला रंगत आलेली असताना आता मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) पोहोचवण्यास भारतीय जनता पार्टीने प्रारंभ केला आहे. निवडणुकीद्वारे १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी ४ सदस्यांचे ४० प्रभाग आणि ५ सदस्यांचा एक प्रभाग आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार असणारा भाजपा हा पुण्यातला एकमेव पक्ष ठरला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) ‘कमळा’चे चिन्ह असणार आहे. महापालिका निवडणूक लढणाऱ्या अन्य एकाही पक्षाचे चिन्ह या पद्धतीने प्रत्येक ईव्हीएमवर असणार नाही. कारण कोणताच पक्ष पूर्ण १६५ उमेदवार देऊ शकलेला नाही. भारतीय जनता पार्टी – रिपाइं (आठवले गट) यांच्यासोबत आघाडी करून निवडणुकीला सामोरी गेली आहे. जागा वाटपाची चर्चा अत्यंत समाधानकारक झाल्याने रिपाइंचे सर्व उमेदवार भाजपाच्या कमळ चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे १६५ ठिकाणी कमळाचे चिन्ह असेल. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि मनसे यांचे चिन्ह अनेक प्रभागातून गायब झालेले दिसेल. प्रत्येक ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह असल्याने प्रत्यक्ष मतदानावेळी पुणेकर मतदाराला भाजपाची निवड करणे सोपे जाणार आहे. शहर पातळीवर विविध पक्षांचे नेते आक्रमक प्रचार करीत असले तरी भिन्न आघाड्या आणि चिन्हांची भाऊगर्दी यामुळे विरोधकांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचे निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इच्छित चिन्ह मतदार राजापर्यंत पोहोचविण्यातच बहुतेक उमेदवारांची दमछाक होत आहे. सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक ९मध्ये (सूस-बाणेर-पाषाण) तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक ३९मध्ये (अप्पर-सुपर इंदिरानगर) आहेत. मतदारांची प्रत्येक प्रभागातील सरासरी संख्या एक लाखाच्या घरात आहे. मतदारांपर्यंत उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे चिन्ह पोहोचवण्यासाठी मोठी यंत्रणा लागणार आहे. हे लक्षात घेऊन भाजपाने वेळेत मतदार चिठ्ठी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रभागात कमळ चिन्ह असल्याने भाजपाचे काम सोपे झाले आहे. मतदारांपर्यंत ‘कमळ’ चिन्ह पोहोचल्याचा नैसर्गिक फायदा प्रत्यक्ष मतदानावेळी भाजपाला होणार आहे. यंत्रणा लागली कामाला – मतदानाला आठवडा शिल्लक असतानाच प्रभागनिहाय मतदार चिठ्ठी वाटपाचे नियोजन भाजपाने सुरु केले आहे. प्रत्येक घरापर्यंत भाजपा उमेदवाराचे नाव आणि ‘कमळ’ चिन्ह पोहोचविण्यासाठी प्रभागाची माहिती असणारे शेकडो तरुण भाजपाच्या अनुभवी कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. थेट मोबाईलवर मतदार चिठ्ठी पाठवण्याची व्यवस्था देखील भाजपाने केली आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 ला मतमोजणी होणार आहे.