प्रभात वृत्तसेवा वाघोली – पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रभाग तीन व प्रभाग चारमध्ये समावेश असलेल्या वाघोली, खराडी, लोहगाव, विमाननगरच्या इच्छुक उमेदवारांनी सोशल मिडीयावर प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी प्रचार सुरू केला असला तरी आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही इच्छुकांनी कोणत्या जागेवर निवडणूक लढविणार तसेच पक्षाच्या चिन्हासह प्रचार सुरू करून आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारांच्या डिजिटल प्रचाराला उधाण आले आहे.सोडत झाल्यानंतर आरक्षण निश्चित होताच उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असल्याने इच्छुक उमेदवारांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात अग्रेसर राहण्यासाठी सुरूवात केली आहे. व्हॉट्सप, फेसबुक, इंस्टाग्रामच्य माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याची चढाओढ सुरू झाली असल्याने अधिकृत निवडणुकीत प्रचाराचा नारळ फोडण्याअगोदरच डिजिटल प्रचाराचा नारळ फोडला आहे. फोटो तसेच व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करून याद्वारे आपण इच्छुक असल्याचे जाहीर करीत जनतेशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.सोशल मिडीयावरील प्रचाराला वेग आला असतानाच अनेक नवीन चेहरे नागरिकांच्या समोर येत आहेत मात्र डिजिटल प्रचाराची भुरळ पाडून चालणार नाही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून मतदारांशी संवाद देखील साधने गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.