प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतच्या तीन प्रभागात मिळुन सरासरी एकुण ५२.२१ टक्के एवढे मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा १.८४ टक्क्याने मतदानाचा टक्का घसरलाच आहे. प्रशासनाकडून मतदारांपर्यंत स्लीपाच पोहोचल्यास नाहीत. मतदार याद्यांमधील घोळ कायम असल्याचा फटका बसल्याने व घरापासून दूरचे मतदान केंद्र मिळाल्याने मतदारांनी निरुत्साहच दाखविण्याची बाब आढळून आली आहे.येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक १ कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित, प्रभाग क्रमांक २ फुलेनगर-नागपुरचाळ, प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगर अशा तीन प्रभागांचा समावेश होतो. प्रामुख्याने या सर्वच प्रभागात झोपडपट्टयांचा सर्वाधिक भाग समाविष्ट आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये एकूण ३३, प्रभाग क्रमांक २ मध्ये एकूण ४१, प्रभाग क्रमांक ६ मध्ये एकूण ४३ याप्रमाणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.दुबार मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याबाबतची हमीपत्र घेण्यात आले. त्यानंतरच त्यांना ओळखपत्रांची पडताळणी करुन मतदानांची संधी देण्यात आली. एकाच पत्यावर राहत असलेल्या एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या दूरच्या मतदान केंद्रात आल्यानेही मतदारांकडून संतप्त भावनाच व्यक्त करण्यात आल्या. काही मतदारांना यादीत आपली नावेच सापडली नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान न करताच निराश होऊन माघारी परतावे लागले. सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प्रभाग १ मध्ये ६.५० टक्के, प्रभाग २ मध्ये ४.८४ टक्के, प्रभाग ६ मध्ये ४.६२ टक्के याप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण ५.४४ टक्के एवढेच मतदान झाले होते. सकाळी ११ नंतर मतदारानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी हा जोर काहीसा ओसरला. दुपारी ३.३० पर्यंत प्रभाग १ मध्ये ३८.३५ टक्के, प्रभाग २ मध्ये ३३.४४ टक्के, प्रभाग ६ मध्ये ३१.४४ टक्के याप्रमाणे एकुण ३४.८३ टक्के एवढे मतदान झाले होते. त्यानंतर सांयकाळी ४ नंतर पुन्हा लांबलचक रांगा लागल्या होत्या. सांयकाळी ५.३० वाजल्याच्या मतदान केंद्रात आलेल्या सर्वांनाच रात्री उशीरापर्यंत मतदानांची संधी द्यावीच लागली. सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये ५३ टक्के, प्रभाग २ मध्ये ५४ टक्के, प्रभाग ६ मध्ये ५५ टक्के या प्रमाणे एकुण मतदान झाले होते. यावरुन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतच्या तीन प्रभागात एकुण ५४.०५ टक्के एवढे मतदान झाले होते. यंदा आता प्रभाग १ मध्ये ५२.९० टक्के, प्रभाग २ मध्ये ५०.२८ टक्के, प्रभाग ६ मध्ये ५३.३९ टक्के या प्रमाणे मतदान झाले आहे. तीनही प्रभागात मिळून ५२.२१ टक्के एवढे एकुण मतदान झाले आहे. तीनही प्रभागात मतदानाची टक्केवारी काहीशी कमी झाली आहे.