पुणे – मनमोकळ्या संवादाद्वारे नागरिकांशी थेट संपर्क साधण्यावर प्रभाग क्रमांक १ (कळस- धानोरी- लोहगाव उर्वरीत)चे उमेदवार अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे यांच्यासह भाजप उमेदवारांकडून भर दिला जात आहे. बुधवारी मुंजाबा वस्ती ते चौधरी नगर परिसरातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, तसेच भावना जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी प्रत्येक गल्लीत आणि घरोघरी जाऊन नागरिकांची आपुलकीने विचारणा केल्याने मतदारही भारावून गेल्याचे दिसून आले. यावेळी प्रभागातील उमेदवार अश्विनी भंडारे, संगीता दांगट, वंदना खांदवे उपस्थित होत्या. प्रचारादरम्यान परिसरातील नागरिकांनी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि भावना मोकळेपणाने मांडल्या. स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, तरुणांचे प्रश्न, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसह विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्यावर टिंगरे यांनी सकारात्मक संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांमध्ये विश्वास आणि चेहऱ्यावर आपुलकी स्पष्टपणे दिसून येत होती. हा प्रचार केवळ मत मागण्यासाठी नसून नागरिकांशी नाते जोडणारा, विश्वास निर्माण करणारा आणि भविष्यासाठी आश्वासक संवाद ठरल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले. मुंजाबा वस्ती ते चौधरीनगर परिसरातील नागरिकांचा उत्साह आणि प्रतिसाद हे अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे यांच्या कार्यशैलीवर वाढत चाललेल्या विश्वासाचे ठोस द्योतक असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले.