पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक २७ मधील उमेदवार महेश (ऊर्फ) अमर आवळे यांचे साने गुरुजी नगर हे कार्यक्षेत्र आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये त्यांचे त्यांच्याच कार्यक्षेत्रात भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो तरुणांनी ‘अमर आवळे तुम आगे बढो…’ अशा घोषणा यावेळी दिल्या. नवी पेठ-पर्वती प्रभागातील भाजपाचे उमेदवार अमर आवळे, स्मिता वस्ते, लता गौडा आणि धीरज घाटे यांच्या पॅनलची पदयात्रा स्नेहनगरमधून निघाली. या पदयात्रेचा समारोप साने गुरुजीनगरमध्ये झाला. अमर आवळे साने गुरुजी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. याच वसाहतीमध्ये ते राहतात. त्यामुळे आपल्यातील एका तरुणाला भाजपने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचा उत्साह येथील कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यातच पदयात्रेचा समारोप साने गुरुजी नगरमध्ये होणार असल्याने मोठी तयारी करण्यात आली होती. पदयात्रा वसाहतीमध्ये आल्यावर सर्व उमेदवारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांकडून औक्षण करण्यात आले. सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा देणारा भलामोठा हारही घालण्यात आला आणि फटाके फोडण्यात आले. महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या या स्वागतामुळे सर्वच उमेदवार भारावून गेले होते.