PMC Election – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधील नागरिकांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “प्रभाग क्रमांक २६ मधील सुज्ञ नागरिकांनी यंदा आम्हाला सेवा करण्याची संधी दिल्यास, आम्ही केवळ निवडणूक काळापुरता नव्हे तर पाचही वर्षे नागरिकांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहू,” असा शब्द उमेदवार सीमा काची यांनी सर्वांच्या वतीने बोलताना दिला. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वीज, ड्रेनेज, शिक्षण व महिला-युवकांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रभागात २४ तास सुरू राहणारे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात येईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. या कार्यालयामार्फत नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून संबंधित विभागांशी समन्वय साधत त्या सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. “विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ, महिला, युवक आणि व्यापारी वर्ग यांना न्याय देणारा, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार हेच आमचे ध्येय आहे,” अशी भूमिका विजय ढेरे यांनी मांडली. प्रभाग क्रमांक २६ चा सर्वांगीण विकास हाच आपला अजेंडा असून, नागरिकांच्या सहकार्याने एक आदर्श प्रभाग घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.