प्रभात वृत्तसेवा पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या निवडणुका नियोजित वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या नेत्यांशी भाजपकडून चर्चा वेगात सुरू झाली आहे. मात्र, पक्षात प्रवेश देण्याबाबतचा अंतिम निर्णय भाजपची कोअर कमिटीच घेणार असून, कमिटीकडून ज्यांची नावे निश्चित होतील, त्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी २१ माजी नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील नगरसेवकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या सर्वांचा पक्षप्रवेश ३ डिसेंबरला होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, आता हे प्रवेश ७ डिसेंबरनंतरच होतील, असे पक्षाकडून या इच्छुकांना कळविण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणुका साडेतीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुकांचा उत्साह वाढला आहे. बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या बहुमताचा प्रभाव पुण्यातही दिसत आहे. याशिवाय प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय मतदार यादींमुळेही भाजपला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यामुळे अनेक इच्छुक निवडणूक लढविताना पराभवाचा धोका टाळण्यासाठी भाजपचीच वाट पकडत आहेत. तर अडचणी वाढणार या इच्छुकांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या असून, ते पक्ष प्रवेशासाठी तयार आहेत. मात्र पक्षाकडून प्रवेश सतत पुढे ढकलल्याने या माजी नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही इच्छुकांनी तर आपल्या बोर्ड, बॅनर, जाहिरातींमधून पक्षाचे नाव, चिन्ह आणि नेत्यांची नावे हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्यास त्यांची अडचण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.