PMC Election 2026: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. आज ३० डिसेंबर रोजी एकूण २२९८ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत आतापर्यंत एकूण ३०४१ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर झालेल्या या निवडणुकीसाठी पुणे महानगरपालिकेने ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये स्थापन केली आहेत. आज दुपारपर्यंत उमेदवारांची मोठी रांग लागल्याने, दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आजच्या अर्जांची कार्यालयनिहाय आकडेवारी: आज दाखल झालेल्या २२९८ अर्जांमध्ये प्रामुख्याने भवानी पेठ आणि हडपसर परिसरात सर्वाधिक उत्साह दिसून आला. भवानी पेठ: २२४ हडपसर – मुंढवा: २१३ येरवडा – कळस – धानोरी: १८२ धनकवडी – सहकारनगर: १८३ नगर रोड – वडगाव शेरी: १४१ कोथरूड – बावधन: १७४ शिवाजीनगर – घोले रोड: १४८ वारजे – कर्वेनगर: १७१ बिबवेवाडी: १६२ कसबा – विश्रामबाग वाडा: १६० सिंहगड रोड: १३४ ढोले पाटील रोड: १२२ औंध – बाणेर: ११० कोंढवा – येवलेवाडी: १०४ वानवडी – रामटेकडी: ८० दरम्यान, २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत एकूण ११,७५६ अर्ज विकले गेले होते, तर आज ३० डिसेंबर रोजी पुन्हा ४७० अर्जांची विक्री झाली. मागील सात दिवसांत ७४३ अर्ज दाखल झाले होते, मात्र शेवटच्या दिवशी ही संख्या प्रचंड वाढली. “आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे उमेदवार कार्यालयात उपस्थित होते, त्या सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सध्या या अर्जांची प्राथमिक तपासणी सुरू आहे. ही आकडेवारी तात्पुरती (Interim) असून यामध्ये अंतिम छाननीनंतर बदल होऊ शकतो,” अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाचे उप आयुक्त यांनी दिली आहे.