वाघोलीच्या विकास कामांचा मनपा अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा

वाघोली – पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील रोड येथील क्षेत्रीय कार्यालय येथे पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या विशेष उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. वाघोलीतील ड्रेनेज लाईनचा मुद्दा, नादुरुस्त रस्ते व त्यामुळे होणारे अपघात, दिवसागणिक वाढत जाणारी वाहतूक कोंडी, कचऱ्याचे अव्यवस्थापण आणि त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, स्ट्रीट लाईटचे अव्यवस्थापण ज्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना वाटणारी भीती अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
यावेळी माजी उपसरपंच संदीप सातव, शांताराम कटके, गणेश सातव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. या सर्व मुद्यांवर लवकरच मार्ग काढून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
…..ही विकासकामे मार्गी लावण्याची मागणी –
1) लोहगाव – वाघोली समान नागरी पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने करणे.
2) कमलबाग येथे ड्रेनेज लाईनचे काम बंद आहे त्यासाठी दोन दिवसात बैठक घेऊन ते काम चालू करणे.
3) रोडवरील अतिक्रमण काढून ट्रॅफिक समस्या दूर करणे.
4) कचरा गाडी वाढवणे, सर्व हाऊसिंग सोसायटीचा कचरा व्यवस्थापन करणे.
5) पाणी योजना पूर्ण होईपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करणे.
6) वाडी वस्तीवर पिण्याच्या पाणी साठी टाकी करणे.
7) जन्ममृत्यू दाखले वाघोली ऑफिस कार्यालयामध्ये मिळण्यासाठी व्यवस्था करणे.
8) वाघोली भावडी रस्ता (दोन कोटी रुपयांच्या निधीतून) काम चालू करणे.
9) जकात नाका ते वाघोली कटकेवाडी – फाटा नगररोड वरील सर्व स्ट्रीट लाईट लावणे.
10) शाळा,अंगणवाडी दुरुस्ती करणे
11) सुचविलेले अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन साठी निधी उपलब्ध करणे
12) ओपन जिम व सार्वजनिक ठिकाणी बेंचेस मिळणे कांमी मागणी केली.
“वाघोली मध्ये ग्रामपंचायत नंतर रखडलेले रस्ते, सांडपाणी, पिण्याचे पाणी, व इतर समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्राधान्यक्रम देऊन कामे तातडीने मार्गी लावावीत. ग्रामस्थांच्या वतीने देखील आयुक्तांकडे विकास कामांच्या बाबतीत पाठपुरावा करण्यात येत आहे.” – संपत गाडे (मुख्य कार्यवाहक, वाहतूक नियंत्रण समिती, पुणे)





