नवी दिल्ली – बिहारमधील निवडणूक नाट्यमय घडामोडींचे केंद्रस्थान ठरते आहे. एकीकडे नव्याने स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीने उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले आहे, तर दुसरीकडे तेजस्वी यादव हे कॉंग्रेस- राष्ट्रीय जनता दल आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.
मविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष बिहारपुरता आघाडीतून बाहेर पडला असला तरी निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो वापरणार असल्याचे या पक्षाने स्पष्ट केले आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे पासवान या निवडणुकीत सक्रिय नाहीत. त्यामुळे त्यांचे खासदार पुत्र चिराग पासवान हेच पक्षाची धुरा सांभाळत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पत्र संयुक्त जनता दलावर तोफ डागत चिराग यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मात्र त्याचवेळी आम्ही प्रचारासाठी नरेंद मोदी यांचाच फोटो वापरणार असल्याचेही त्यांच्या पक्षाने स्पष्ट केले आहे. भाजप आम्हाला सोबत घेवो अथवा न घेवो आम्ही त्यांच्यासोबत जाणार आणि त्यांच्यासोबतच सरकार स्थापन करणार असे लोकजनशक्ती पक्षाने म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या निवडणुकीसाठी मोदी यांचे नाव आणि फोटो वापरू शकतात तर आम्ही का वापरू नये, असा प्रश्नही या पक्षाचे नेते रामेश्वर चौरसिया यांनी केला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून लढणारे पक्ष मोदी यांच्या फोटोचा वापर करू शकतात, असे भाजपने अगोदरच जाहीर केले आहे. याचे कोणी उल्लंघन केले तर आम्ही निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करू असा इशाराही भाजपने दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी स्वत: बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून पूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मोदींच्या राज्यात 20 सभा होणार आहेत. ते केवळ भाजपच नव्हे, तर नितीश यांच्या पक्षाच्या उमेदवारांचाही प्रचार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 2015 च्या निवडणुकीत त्यांनी विक्रमी 31 सभा घेतल्या होत्या.