पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शुक्ला यांना एक्सिऑम-4 मोहिमेच्या यशाबद्दल अभिनंदन केले. शुभांशु यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू देऊन आपल्या अंतराळ मोहिमेचे अनुभव सविस्तर सांगितले. पंतप्रधानांनी इस्रोच्या अंतराळवीर जॅकेटमधील शुक्ला यांचे मिठी मारून स्वागत केले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांच्यासोबत चालताना दिसले.
#WATCH | Group Captain Shubhanshu Shukla, who was the pilot of Axiom-4 Space Mission to the International Space Station (ISS), meets Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/0uvclu9V2b
— ANI (@ANI) August 18, 2025
शुभांशु शुक्ला यांनी इतिहास रचला आहे. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले. 25 जून 2025 रोजी फ्लोरिडाहून सुरू झालेल्या एक्सिऑम-4 मोहिमेद्वारे ते अंतराळात गेले आणि 26 जूनला आयएसएसवर पोहोचले. 18 दिवसांच्या मोहिमेत त्यांनी अमेरिकेच्या पैगी व्हिटसन, पोलंडच्या स्लावोज उज़्नान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीच्या टिबोर कापू यांच्यासोबत अनेक प्रयोग केले. 15 जुलै रोजी ते पृथ्वीवर परतले आणि रविवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत झाले.
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून शुक्ला यांच्या यशाचे कौतुक केले होते. ही भेट भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक आहे.





