PM Modi Calls Tarique Rahman: हसीनांनंतर आता तारिकशी मैत्री! PM मोदींच्या एका फोन कॉलने ढाका ते दिल्लीपर्यंत खळबळ
PM Modi Calls Tarique Rahman:

PM Modi Calls Tarique Rahman: बांगलादेशातील १३ व्या संसदीय निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (BNP) मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदींनी या विजयाचे वर्णन ‘निर्णायक विजय’ असे करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या एका फोन कॉलमुळे दोन्ही देशांच्या राजकीय आणि राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ माजली असून आगामी काळातील संबंधांबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.
‘बीएनपी’ला प्रचंड बहुमत –
बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत बीएनपीने दोन-तृतीयांश पेक्षा अधिक जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. हा विजय ऐतिहासिक मानला जात असून, निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांच्याशी संवाद साधला. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या संभाषणाची माहिती देताना सांगितले की, तारिक रहमान यांच्याशी बोलून त्यांना आनंद झाला. त्यांनी बांगलादेशच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी रहमान यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला. तसेच दोन जवळचे शेजारी देश म्हणून, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, बांगलादेशातील शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी भारताची कटिबद्धता त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान –
हा फोन कॉल अशा वेळी झाला आहे जेव्हा बीएनपीचा विजय बांगलादेशच्या राजकारणात मोठा बदल घडवणारा ठरत आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे दीर्घकाळ लंडनमध्ये वास्तव्यास होते, मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आता जबरदस्त कामगिरी केली आहे. विविध अहवालांनुसार, तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात आणि १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
बीएनपीला २११ हून अधिक जागा –
निवडणूक निकालांमध्ये बीएनपीला २११ हून अधिक जागा मिळाल्या आहेत, तर जमात-ए-इस्लामी युतीला ७० आणि इतरांना १८ जागा मिळाल्या आहेत. बांगलादेशात गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेनंतर हे निकाल समोर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा सत्तापालट भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नवीन ऊर्जा आणू शकतो. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की, भारत एका लोकशाहीवादी, पुरोगामी आणि सर्वसमावेशक बांगलादेशाला आपले सहकार्य चालूच ठेवेल.
बीएनपीने देखील पंतप्रधान मोदींच्या या शुभेच्छांचे स्वागत केले असून दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांवर भर दिला आहे. हे पाऊल भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ (शेजारी प्रथम) धोरणाशी सुसंगत असून, भारत प्रादेशिक स्थिरता आणि सहकार्याला नेहमीच प्राधान्य देतो. येणाऱ्या काळात दोन्ही नेत्यांमधील संवादामुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत.





