मोठी बातमी: ‘माझ्याकडे 20 किलो RDX आहे, मोदींना संपवणार’, पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुंबई शाखेला पाठवलेल्या ईमेलमध्ये पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यात म्हटले आहे की, 20 स्लीपर सेल तयार आहेत त्यांच्याजवळ 20 किलो आरडीएक्स आहे. पीएम मोदींच्या हत्येचा कट उघड होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे ई-मेलरने लिहिले आहे. सुरक्षा एजन्सी पीएम मोदींच्या हत्येचा कट रचल्याबद्दल मिळालेल्या ई-मेलचा स्रोत काय आहे याची माहिती गोळा करत आहेत.
ईमेलनुसार, हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना धमकीचे ई-मेल पाठवले आहेत. ज्या मेल आयडीवरून मेल आला आहे त्याची सखोल छाननी सुरू आहे.
तो पंतप्रधानांसह लाखो लोकांचे नुकसान करण्यास तयार असल्याचे धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले आहे. तसेच ‘…मी काही दहशतवाद्यांना भेटलो आहे, ते मला आरडीएक्समध्ये मदत करतील, मला आनंद आहे की मला बॉम्ब अगदी सहज मिळाले आणि आता मी सर्वत्र स्फोट करेन… मी योजना आखली आहे, 20 स्लीपर सेल सक्रिय केले जातील आणि लाखो लोक मारले जातील…’
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही पीएम मोदी आणि यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. युजरने ट्विट करून दोन्ही नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दीपक शर्मा असे वापरकर्त्याचे नाव होते. या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून ट्विटरवरून युजरची माहिती मागवली होती.





