हिंदूंची सुरक्षा ते चिकन नेकचा वाद: मोदी-यूनुस भेटीत कोणते मुद्दे गाजले?

बँकॉक – थायलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे नेते मोहम्मद यूनुस यांची भेट झाली. सध्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध तणावपूर्ण असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, यूनुस यांच्या विनंतीनंतरच ही भेट घडली, यापूर्वी भारताने कोणताही पुढाकार घेतला नव्हता. या भेटीत हिंदूंच्या सुरक्षेपासून सीमा सुरक्षेपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले.
मोदींनी बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या सुरक्षेची हमी आणि संबंधित प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच, बांग्लादेशातून होणारी बेकायदा घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षेवर भर देण्याची भारताची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही देशांनी परस्पर फायद्याच्या दृष्टिकोनातून काम करावे, असेही मोदी म्हणाले. यापूर्वी अशाच सहकार्यामुळे दोन्ही देशांना लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
संबंध का बिघडले?
मोहम्मद यूनुस यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे तणाव वाढला आहे. बांग्लादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, भारताबद्दल सातत्याने केलेली टीका आणि अलीकडेच चिकन नेकबाबतचे वादग्रस्त विधान यामुळे भारताने यूनुस यांच्याशी संवाद साधण्यात फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, बांग्लादेशाकडून सातत्याने भेटीची विनंती आल्यानंतर ही चर्चा घडली. गुरुवारी थायलंडच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनात मोदी आणि यूनुस एकत्र दिसले होते, तेव्हापासूनच संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवली जात होती.
शेख हसीनांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात कट्टरपंथी कारवाया वाढल्या, ज्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम झाला. यूनुस यांच्या नेतृत्वातही परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत असल्याचे दिसते.
चिकन नेक वाद काय?
यूनुस यांनी चिकन नेकबाबत बोलताना चीनचा उल्लेख केला आणि तिथे चीनसाठी संधी असल्याचे म्हटले, ज्यामुळे भारत अस्वस्थ झाला. चिकन नेक म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉर हा ६० किमी लांब आणि २२ किमी रुंद असा संवेदनशील भाग आहे. हा मार्ग भारताच्या मुख्य भूमीला ईशान्येकडील सात राज्यांशी (सेव्हन सिस्टर्स) जोडतो. मुर्गीच्या मानेसारखा दिसणारा हा प्रदेश नेपाल, चीन, भूटान आणि बांग्लादेशाने वेढलेला आहे. त्यामुळे त्याचे सामरिक महत्त्व प्रचंड आहे. यूनुस यांच्या या विधानाने भारताच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
बांग्लादेशात सध्या अस्थिरता वाढत असून, तिथे पुन्हा तख्तापलटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भारताने आपली भूमिका ठामपणे मांडल्याचे या भेटीतून दिसून आले.





