Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्सचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोपातील तीन देशांचा दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. मोदी १३ ते १७ मे दरम्यान क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्सचा दौरा करणार होते. पंतप्रधान नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नॉर्वेला जाणार होते. संबंधित देशांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
रशिया दौराही पुढे ढकलला
यापूर्वी पंतप्रधान मोदींनीही त्यांचा रशिया दौरा पुढे ढकलला होता. पंतप्रधान ९ मे रोजी मॉस्को येथे होणाऱ्या विजय दिन परेडला उपस्थित राहणार होते.पंतप्रधान मोदींना रशियाने विजय दिन परेडसाठी आमंत्रित केले होते. तथापि, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांचा दौरा पुढे ढकलला.





