पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी लाजिरवाणी, पंजाब हे दहशतवादी कारवायांचे केंद्र : कंगना

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या. आंदोलकांमुळे त्यांचा ताफा 15 ते 20 मिनिटे थांबला होता. या हलगर्जीपणासाठी केंद्र सरकारने पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. यावरून सोशल मीडियावर काँग्रेसवर जोरदार टीका झाली. दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौतनेही या प्रकरणी आपली बाजू मांडताना पंजाब हे दहशतवादी कारवायांचे केंद्र असून पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी लाजिरवाणी असल्याचे विधान कंगणाने यावेळी केले आहे.

कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, पंजाबमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे. आदरणीय पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते, प्रतिनिधी आणि 140 कोटी जनतेचा आवाज आहेत. त्यांच्यावर असा हल्ला म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकावरील हल्ला होय. हा आपल्या लोकशाहीवरही हल्ला आहे.
कंगनाने पुढे लिहिले की, पंजाब दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत आहे. आता आपण थांबवले नाही तर देशाचे मोठे नुकसान होऊ शकते. यासोबत कंगनाने हॅशटॅगमध्ये Bharat Stand With Modi Ji.. असे लिहले आहे. कंगनाच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.





