PM Modi Mauritius Visit : मॉरिशसला “मिनी इंडिया” का म्हणतात? भोजपुरी भाषेशी संबंध काय? जाणून घ्या 191 वर्षांपूर्वी भारतीय मजूर येथे कसे पोहोचले

PM Modi Mauritius Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मॉरिशसला पोहोचले, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना भोजपुरी गाणी आणि संगीताने सन्मानित करण्यात आले. पीएम मोदी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी येथे पोहोचले आहेत. 12 मार्च रोजी या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. X वरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी या विशेष स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की मॉरिशसच्या संस्कृतीत भोजपुरी भाषा अंतर्भूत आहे हे अत्यंत प्रशंसनीय आहे.
मॉरिशस आणि भारत यांच्यातील सखोल संबंध –
मॉरिशस आणि भारत यांच्यात विशेषत: भोजपुरी भाषेशी घट्ट नाते आहे. पीएम मोदी यांचे सरकार गेल्या अनेक वर्षांपासून मॉरिशससोबतचे विशेष संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तिथल्या प्रमुख भाषांमध्ये भोजपुरी आणि हिंदीचा समावेश का करण्यात आला आहे ते जाणून घेऊया…
मॉरिशस हा हिंदी महासागरात वसलेला एक छोटासा बेट देश आहे, हा देश आफ्रिकेच्या आग्नेय, मादागास्करजवळ आहे. हा मस्करीन बेटांचा भाग असून 12 मार्च 1968 रोजी तो ब्रिटनपासून स्वतंत्र झाला. येथील लोकसंख्या सुमारे 12 लाख आहे, त्यापैकी 70% लोक भारतीय वंशाचे आहेत. येथे हिंदू धर्म पाळणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
मॉरिशस आणि भोजपुरी यांच्यातील संबंध –
मॉरिशस एकेकाळी ब्रिटीश आणि फ्रेंच अंमलाखाली होता. 1834 ते 1900 या काळात ब्रिटिशांनी सुमारे पाच लाख भारतीयांना येथे मजुरीसाठी आणले गेले. यातील दोन तृतीयांश लोक येथे स्थायिक झाले. 2 नोव्हेंबर 1834 रोजी बिहारमधून भोजपुरी बोलणारे पहिले 36 भारतीय मजूर ‘ऍटलस’ या जहाजाने मॉरिशसला पोहोचले. या कारणास्तव हा दिवस मॉरिशसमध्ये स्थलांतरित दिवस म्हणून साजरा केला जातो. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईसमधील प्रवासी घाट हे भारतीय कामगार पहिल्यांदा आलेले ठिकाण आहे. ही जागा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, मॉरिशसच्या एकूण लोकसंख्येपैकी 5.3% लोक भोजपुरी बोलतात, जे 2000 मध्ये 12.1% होते. उर्दू, तमिळ आणि तेलगू भाषाही येथे प्रचलित आहेत.
फ्रेंच आणि क्रेओलपेक्षा भोजपुरी अधिक –
मॉरिशसमधील अधिकृत भाषा इंग्रजी आहे, परंतु फ्रेंच आणि क्रेओल या भाषा देखील मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष भोजपुरी भाषिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या प्रचारात भोजपुरी भाषेचा वापर करतात. मॉरिशसमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या जास्त असल्याने याला अनेकदा ‘मिनी इंडिया’ म्हटले जाते. स्वातंत्र्यापूर्वी यूपी आणि बिहारमधून अनेक लोकांना येथे मजुरीसाठी आणले होते. या लोकांनी मॉरिशसमध्ये भोजपुरी आणि हिंदी भाषा लोकप्रिय केल्या.
भारतीय संस्कृतीशी नाते –
मॉरिशसमध्ये केवळ भाषाच नाही तर भारतीय संस्कृतीही स्पष्टपणे दिसून येते. इथल्या खेड्यापाड्यात स्त्रिया साडी नेसून झुमर, सोहर, कजरी किंवा रातवाई अशी पारंपरिक गाणी गाताना दिसतात. मॉरिशसमध्ये 2005 मध्ये प्राथमिक शाळांमध्ये भोजपुरी हा पर्यायी विषय बनवण्यात आला होता आणि 2012 मध्ये चौथ्या वर्गासाठी अनिवार्य करण्यात आला होता. 2013 मध्ये, सरकारने भोजपुरी भाषेचा प्रचार करण्यासाठी एक भोजपुरी-भाषिक संघटना तयार केली, ज्याचे उद्दिष्ट बोलचाल आणि लिखित स्वरूपात मजबूत करणे होते. 2015 मध्ये या कायद्यात काही बदलही करण्यात आले जेणेकरुन भाषेशी संबंधित शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य पुढे नेले जावे.
2017 मध्ये, भोजपुरी भाषा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भोजपुरी स्पीकिंग कौन्सिलची स्थापना करण्यात आली. शिवाय, 2007 च्या भाषा कायद्याने मॉरिशसमधील अनेक भाषा आणि सांस्कृतिक विविधता यांना महत्त्व दिले आहे. देशाच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असलेल्या भोजपुरीसारख्या भाषांचे महत्त्वही या कायद्याने मान्य केले आहे.
2018 मध्ये, मॉरिशस सरकारने भोजपुरी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू केला. जानेवारी 2019 मध्ये, तत्कालीन पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ यांनी वाराणसी येथील प्रवासी भारतीय दिवस 2020 मध्ये मॉरिशसमध्ये आंतरराष्ट्रीय भोजपुरी महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा केली. परंतु कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊनमुळे ते आयोजित करता आले नाही. भोजपुरी महोत्सव 2024 मॉरिशसच्या हॉटेल, बेले मारे, फ्लॅक, मॉरिशस येथे आयोजित करण्यात आला होता.
गीत-गवई म्हणजे काय?
गीत-गवई हा एक पारंपारिक विवाहपूर्व सोहळा आहे जो हिंदू देवतांना भजन, प्रार्थना, संगीत आणि नृत्याद्वारे सन्मानित करतो. ते स्थलांतरित लोकांच्या सांस्कृतिक ओळखीशी जोडलेले आहे, ज्यांनी त्यांची भाषा आणि परंपरा जपण्यासाठी संघर्ष केला. ही परंपरा कुटुंबे, सामुदायिक केंद्रे आणि अकादमींमधून पार पडली आहे. युनेस्कोनेही त्याला मान्यता दिली आहे. जुलै 2024 मध्ये, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे मॉरिशसमधील ग्रँड बोईस मेडी क्लिनिकमध्ये पारंपारिक ‘भोजपुरी गीत-गवई’ सह स्वागत करण्यात आले. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी X वर लिहिले की, “मॉरिशस हे घरापासून दूर असलेल्या एका घरासारखे आहे! येथे भोजपुरी गाण्यांनी स्वागत करणे हे भारत आणि मॉरिशसमधील खोल नाते दर्शवते.”






