‘माणूस आहे, देव थोडीच… माझ्याकडूनही चुका होतात’, पंतप्रधान मोदींच्या पहिल्याच पॉडकास्टचा व्हीडिओ व्हायरल

PM NARENDRA MODI PODCAST : झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांची पॉडकास्ट सीरिज ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ प्रचंड लोकप्रिय आहे. या सीरिजच्या माध्यमातून कामत हे प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखत घेतात. विशेष म्हणजे निखिल कामथ यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पॉडकास्ट केले आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पॉडकास्टचा व्हीडिओ रिलीज करण्यापूर्वी निखिल कामथने दोन मिनिटांचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये निखिल पंतप्रधानांना विविध विषयांवर प्रश्नां विचारताना दिसत आहे. यावेळी पंतप्रधानांनी हे त्यांचे पहिलेच पॉडकास्टचे असल्याचे सांगितले. पॉडकास्टचा हा 6वा एपिसोड असून, याला ‘पीपल विथ द प्राईम मिनिस्टर’ असे नाव देण्यात आले आहे.
निखिल कामथ पॉडकास्टमध्ये एखाद्या व्यक्तीला नेता व्हायचे असल्यास त्याच्याकडे कोणते गुण हवेत? असा प्रश्न विचारतात. यावर बोलताना मोदी म्हणाले की, ‘राजकारणात चांगली लोक सातत्याने यायला हवीत. महत्त्वकांक्षेऐवजी काहीतरी ध्येय घेऊन लोकांनी यायला हवे. मुख्यमंत्री झाल्यानंतर केलेल्या एका भाषणात म्हणालो होतो, माझ्याकडूनही चुका होतात. मी सुद्धा माणूस आहे, देव थोडीच.’
I hope you all enjoy this as much as we enjoyed creating it for you! https://t.co/xth1Vixohn
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2025
जगभरातील काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाविषयी या पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, जगात जे सुरू आहे, त्यावर आपल्याला चिंता वाटायला हवे. संकटाच्या काळात तटस्थ नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. नेहमीच सांगितले की, मी शांततेच्या बाजूने आहे.
पहिल्या कार्यकाळापेक्षा दुसरा कार्यकाळ कसा वेगळा होता या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले की, पहिल्या कार्यकाळात लोकं मलाही समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तसेच, मी देखील दिल्ली समजून घेत होतो.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या पॉडकास्टचा टीझरच अद्याप समोर आला आहे. पॉडकास्टचा पूर्ण व्हीडिओ कधी रिलीज होणार याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ पॉडकास्ट सीरिजमधील हा 6वा एपिसोड आहे. याआधी या पॉडकास्टमध्ये बिल गेट्स, नंदन निलेकणी, कुमार बिर्ला, यांन लेकन आणि रणबीर कपूर सहभागी झाले होते.





