पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचे उद्घाटन, याचे वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pamban Bridge inauguration | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. तामिळनाडूमध्ये त्यांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच, प्राचीन तमिळ संस्कृती, सभ्यता आणि तमिळ इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या पंबन पुलाला राष्ट्राला समर्पित केले.
पंतप्रधान मोदींनी समुद्रात उभारलेल्या या देशातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट पूलाचे उद्घाटन केले. हा पूल तामिळनाडूतील रामेश्वरम येथे आहे. नवीन पंबन पूल 6,790 फूट लांब असून समुद्रात 2.08 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. हा देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी तामिळनाडूमध्ये 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली. पंबन पूल ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बांधण्यात आला आहे आणि तो पुढील 100 वर्षांपर्यंत सुरक्षित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय रेल्वेचे प्रवक्ते दिलीप कुमार यांनी याबाबतची माहिती दिली, देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी रचना असलेला पंबन पूल आता तयार झाला आहे. हा परूल ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बनवला गेला आहे जुना पूल उघडण्यासाठी साधारणपणे 45 मिनिटे लागतात, तर नवीन पूल फक्त पाच मिनिटात उघडतो आणि 3 मिनिटात बंदही होतो.
त्यांनी पुढे सांगितले की, पंबन पुलाजवळ समुद्रातील वारे खूप वेगाने वाहतात. कधी कधी वाऱ्याचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नलला वाऱ्याच्या वेगाशी जोडले आहे. उदाहरणार्थ, वाऱ्याचा वेग 50 किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त झाल्यास, तात्काळ रेल्वेची वाहतूक थांबवण्यात येईल.
पंबन पुलाची वैशिष्ट्ये काय?
- हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे.
- नवीन पंबन पूल समुद्रात 6,790 फूट लांब आहे.
- 99 कमानी 18.3 मीटर उंच आहेत आणि मध्यवर्ती व्हर्टिकल कमान (Arch) 72.5 मीटर उंच आहे.
- हा जवळपासच्या सर्वात जुन्या रेल्वे पुलापेक्षा 3 मीटर उंच आहे.
- यामध्ये भविष्यात दुहेरी मार्गिकेच्या बांधकामासाठी पाया आणि रचना आहे.
- याला रेल्वे संशोधन डिझाइन आणि मानक संस्थेने (RTSO) मान्यता दिली आहे.





