Authenticity of EVM : निवडणुका जिंकण्यासाठी मोदींकडून फ्रॉडचा अवलंब, मल्लिकार्जुन खर्गेंचे टीकास्त्र…

बंगळुरू – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इव्हीएम) विश्वासार्हतेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रॉड मार्गांचा अवलंब करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही केला.
इव्हीएमविषयी साशंकता व्यक्त करताना खर्गे यांनी जागतिक स्तरावरील आघाडीचे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या दाव्याचाही आधार घेतला. मस्क हे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत. इव्हीएम हॅक केले जाऊ शकतात, त्या यंत्रांमध्ये फेरफार केला जाऊ शकतो असे मस्क यांचे म्हणणे आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स किंवा इटलीसारखे महत्वाचे देश इव्हीएमचा वापर करत नाहीत. मात्र, भाजपचे नेते सातत्याने इव्हीएमचे समर्थन करतात.
विरोधक स्वत: जिंकल्यानंतर इव्हीएमला दोष देत नाहीत. पण, आम्ही जिंकल्यानंतर ते इव्हीएमला दोष देतात असा भाजप नेत्यांचा युक्तिवाद असतो. त्यांची रणनीती आम्हाला ठाऊक आहे. काय करायचे आणि कुठे करायचे हे त्यांना माहीत असते. भाजपच्या विजयाची निश्चिती करण्यासाठी कधी मतदार यादीतून १० हजार नावे वगळली जातात. तर, कधी १० ते २० हजार नवी नावे समाविष्ट केली जातात. ती बाब खरी आहे. पण, सिद्ध कशी करायची हा खरा प्रश्न आहे, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यासाठी कॉंग्रेसच्या कर्नाटक शाखेने विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये खर्गे बोलत होते. सरदार पटेलांना कॉंग्रेसपासून विभक्त करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. पण, ते कदापि घडणार नाही. सरदार पटेलांची कॉंग्रेसच्या विचारसरणीवर गाढ श्रद्धा होती. त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती, असे भाष्य त्यांनी केले.





