PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील आपल्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अहमदाबाद येथे रोड शो केला आणि जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ५,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी गुजरातला ‘दोन मोहनांची भूमी’ संबोधत सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्ण आणि चरखाधारी महात्मा गांधी यांच्या विचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “सुदर्शन चक्र शत्रूंना पाताळातही शोधून शिक्षा करते. संपूर्ण जग याचा अनुभव घेत आहे.” दहशतवाद्यांना सोडणार नाही – पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत सांगितले की, भारत आता दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना कुठेही लपले तरी सोडत नाही. “पहलगाम हल्ल्याचा बदला २२ मिनिटांत घेतला. ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सैन्याच्या शौर्याचे आणि सुदर्शन चक्रधारी मोहनाच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेसवर टीका – महात्मा गांधींच्या स्वदेशी आणि स्वच्छतेच्या विचारांचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “काँग्रेसने गांधींच्या नावावर सत्ता उपभोगली, पण त्यांच्या आत्म्याला चिरडले. त्यांनी स्वदेशी आणि स्वच्छतेला कधीच प्रोत्साहन दिले नाही. आयातीच्या नावाखाली घोटाळे केले.” आत्मनिर्भर भारताच्या दिशेने देश प्रगती करत असल्याचे सांगताना त्यांनी शेतकरी, मच्छीमार आणि उद्योजकांच्या योगदानाचे कौतुक केले. आर्थिक स्वार्थ आणि टॅरिफ – जागतिक आर्थिक स्वार्थाच्या राजकारणाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “आम्ही लघु उद्योजक, शेतकरी आणि पशुपालकांचे नुकसान होऊ देणार नाही. दबाव कितीही असला तरी आम्ही ताकद वाढवत राहू.” याशिवाय, त्यांनी गणेशोत्सवाच्या उत्साहाचा उल्लेख करत गुजरातमधील विकासकामांचे महत्त्व अधोरेखित केले. नैसर्गिक आपत्तींवर संवेदना गुजरातसह देशभरातील पूर आणि नैसर्गिक आपत्तींवर बोलताना पंतप्रधानांनी प्रभावित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली. ते म्हणाले, “केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत बचाव आणि मदतकार्यात तत्पर आहे.” गुजरातचा विकास – गुजरातच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले, “गुजरात देशाच्या एक तृतीयांश निर्यातीचे केंद्र आहे. सौर, पवन आणि अणुऊर्जेत गुजरात आघाडीवर आहे. येथे मेट्रो कोच परदेशात निर्यात होत आहेत, तसेच ईव्ही आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातही प्रगती होत आहे.” गेल्या २०-२५ वर्षांत गुजरातच्या कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती झाल्याचेही त्यांनी नमूद केले. जनता सर्वोपरि- “मोदींसाठी जनता सर्वोपरि आहे,” असे सांगत पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाला गुजरातमधून मिळणाऱ्या ऊर्जेचा उल्लेख केला. अहमदाबाद आता देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक असल्याचेही त्यांनी सांगितले.