PM Modi: जागतिक राजकारणात भारताचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध डेटा इंटेलिजन्स फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने (Morning Consult) प्रसिद्ध केलेल्या ताज्या सर्वेक्षणात ६८ टक्के रेटिंगसह मोदींनी अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक पाश्चिमात्य नेत्यांना मोदींनी मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. सर्वेक्षणातील महत्त्वाची आकडेवारी- ६८ टक्के लोकांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे, तर २६ टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ६ टक्के लोकांनी कोणतेही मत दिलेले नाही. मोदींनंतर स्वित्झर्लंडचे गाय पारमेलिन ६२ टक्के रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग हे देखील ६२ टक्के रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत, मात्र त्यांची ‘डिस्प्रुव्हल’ रेटिंग अधिक आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी ५५ टक्के रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे केवळ १७ टक्के रेटिंगसह या यादीत तळाला आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता घसरली? सध्या अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रेटिंग ३९ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ५५ टक्के अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. डिजिटल विश्वातही विक्रम – पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा प्रत्यय सोशल मीडियावरही येत आहे. नुकतेच इन्स्टाग्रामवर १०० दशलक्ष (१० कोटी) फॉलोअर्सचा टप्पा पार करणारे ते जगातील पहिले जागतिक नेते ठरले आहेत. २०१४ मध्ये इन्स्टाग्रामवर पदार्पण केल्यानंतर गेल्या दशकात त्यांचे खाते जगातील सर्वात सक्रिय डिजिटल स्पेस बनले आहे.