PM-Kisan Samman Nidhi Scheme: केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेतंर्गत 18 हप्ते देण्यात आले आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 वा हप्ता जमा केला जाणार आहे. मात्र, 19व्या हप्त्याआधी पीएम किसान योजनेंतर्गत वर्षाला दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या रक्कमेत वाढ झाल्यास लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकेल. तुम्ही जर शेतकरी असाल व अद्याप या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला नसल्यास, याबाबतची प्रक्रिया जाणून घ्यायला हवी. पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार? सध्या गरजू शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत वर्षाला 3 टप्प्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. मात्र, मागील काही महिन्यांपासून या रक्कमेत वाढ केली जाणार असल्याची चर्चा आहे. संसदीय समितीने ही रक्कम वर्षाला 12 हजार रुपये करण्यात यावी अशी शिफारस केली आहे. त्यामुळे सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये ही रक्कम 6 हजार रुपयांवरून 10 ते 12 हजार रुपये केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता? पीएम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचे नाव, आधार नंबर, बँक खात्याची माहिती, जमिनीविषयी माहिती मागितली जाईल. या माहितीसह तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक व जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी अर्जाची स्थिती देखील तपासू शकता. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होतील.