Satara: कास तलाव परिसरात दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
Satara याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जनसेवा फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अभिजीत देशपांडे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अभय टोणपे, डॉ. जाकिर इनामदार, डॉ. रमाकांत साठे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपचे दीपक भोसले, विलास कासार, मधुकर पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Satara: कास तलाव परिसरातील पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता अधिक समृद्ध करण्यासाठी जनसेवा फाउंडेशन आणि कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 10 हजार झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कास तलाव परिसरात पहिल्या टप्प्यात 500 झाडांच्या लागवडीने होणार आहे. या वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्ष वेदांतिका भोसले यांच्या हस्ते होणार असून, नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जनसेवा फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अभिजीत देशपांडे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अभय टोणपे, डॉ. जाकिर इनामदार, डॉ. रमाकांत साठे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपचे दीपक भोसले, विलास कासार, मधुकर पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कास तलाव परिसराची अन्नसाखळी, जैवविविधता आणि नैसर्गिक पर्यावरण अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने तलावाच्या कडेकडेने विविध स्थानिक आणि पर्यावरणास अनुकूल वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 500 झाडे लावण्यात येणार असून, पुढील काळात हा उपक्रम टप्प्याटप्प्याने विस्तारून 10 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. कास तलावालगत असलेल्या नगरपालिका मालकीच्या जागांमध्ये तसेच धरणाच्या भिंतीलगत उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही आणि कासच्या नैसर्गिक अधिवासाला पूरक ठरतील, अशाच वृक्षप्रजातींची निवड करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कास परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी सातारकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. देवेंद्र पाटील यांनी केले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर 30 ऑगस्टपासून सुरू होणारा हा उपक्रम कासच्या पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.





