अहमदाबाद : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या न्यायालयात हजेरी लावत आहेत. अहमदाबादमधल्या एका मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने राहुल गांधींना 50 हजार रुपयांच्या जामिनाचा आदेश दिला. त्यावर प्लीज, 15 हजार रुपयांत करा, असे त्यांचे वकील म्हणाले. न्यायालयाने राहुल गांधींना विचारले, तुम्ही दोषी आहात का? त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिले, नाही, ‘मी दोषी नाही.’ तसेच, तुम्ही स्वत:चा बचाव करू इच्छिता का? असेही न्यायालयाने विचारले असता त्यावर राहुल गांधी उत्तरले, ‘हो. मी माझा बचाव करू इच्छितो.’
दरम्यान, या खटल्यात राहुल गांधींना जामीन मिळू शकतो, असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने पहिल्यांदा त्यांना 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. त्यावर राहुल गांधींच्या वकिलांनी, हा जामीन 15 हजार रुपये करा, अशी विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली आणि अशा रितीने जामिनाचे 35 हजार रुपये वाचले.
राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून नाबार्ड बॅंकेवर काही आरोप केले होते. ही याचिका मुंबईच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने दाखल केली होती. या प्रकरणी राहुल गांधींना 27 मे ला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राहुल गांधींच्या विनंतीवरून त्यांना न्यायालयाने मुदत वाढवून दिली आणि 12 जुलैला हजर राहण्याची परवानगी दिली.