Plastic Seizure – तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत होलसेल दुकानदारांची प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली. यामधून १५ हजार रुपयाचा रोख दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व आरोग्यसमिती सभापती निखील भगत यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिक तपासणी करण्यासाठी गाव भागामध्ये पथक गेले असता जिजामाता चौक स्टेशन रोड या भागात दुकानाची तपासणी केली. यामध्ये साहिल स्पेशल बिर्याणी हाऊस, कृष्णा ट्रेडर्स, उबाळे सुगंधालय या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्या असून सुमारे ६० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. प्रत्येकी प्रथम प्लास्टिक आढळून आल्यामुळे पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक जप्ती मोहिमेमध्ये प्रत्यक्ष नगराध्यक्ष संतोष दाभाडे, आरोग्य सभापती निखिल भगत हे उपस्थित होते. त्यांनी दुकानदारांना प्लास्टिक बंदी असल्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक वापरू नये व विक्री करू नये असे सांगितले. कारवाईमध्ये प्लास्टिक बंदी पथकातील पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, शुभम चौकटे व अतिक्रमण पथकातील कर्मचारी सहभागी झाले होते.