प्लॅस्टिकमुक्त जनजागृती रॅली, घोषवाक्य स्पर्धा

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत प्लॅस्टिकमुक्त तळेगावसाठी जनजागृती रॅली व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. घोषवाक्य स्पर्धेत संत ज्ञानेश्वर शाळेची विद्यार्थिनी सिद्धी रंजवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. सरसेनापती उमाबाई दाभाडे शाळेची समृद्धी शेंद्रे हिला द्वितीय, तर लोकमान्य टिळक शाळेतील विद्यार्थी राहुल पुजारी याला तृतीय क्रमांक मिळाला.
रॅलीदरम्यान नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी चौकाचौकात प्लास्टिक मुक्तीवर पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने महात्मा गांधी व प्लास्टिकचा भस्मासुर हे साकारणारे कलाकारही कार्यक्रमात सहभागी झाले होते. टेक्नोवेस कंपनीच्या वतीने निखिल महापात्रा यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके दिली. कविता खोल्लम व ममता मेडिकल यांच्या वतीने खाऊचे वाटप, तर ढमाले डेअरी कडून सर्व विद्यार्थ्यांना सुगंधित दूध देण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी नागरिकांना प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर उपमुख्यधिकारी ममता राठोड, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, सहप्रांतपाल दीपक फल्ले, अध्यक्ष संतोष परदेशी, माजी अध्यक्ष किरण ओसवाल, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित, माजी नगरसेवक अरुण माने, राकेश ओसवाल, विनोद राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता खोल्लम यांनी, सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी व आभार प्रदर्शन प्रदीप टेकवडे यांनी केले. मान्यवरांनी प्लास्टिकविरोधात जनजागृती करत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला.




