‘प्लाझ्मादानाबाबत व्यापक जनजागृती करावी’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत आदेश
पुणे – करोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहे. करोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. प्लाझ्मादानबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ऍप तयार करावे, असे आदेशही त्यांनी दिले.
करोना विषाणू उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, करोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल.
करोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्रपणे अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, करोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेऊन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल.
यावेळी उत्पादन शुल्क मंत्री वळसे-पाटील यांनीही आरोग्य यंत्रणेस सूचना केल्या तर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमधील स्थितीची माहिती दिली.





