माथेरानमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय? आजपासून पर्यटकांसाठी माथेरान बेमुदत बंद

Matheran Tourism Close | जर तुम्ही माथेरानमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी वाचा. आज 18 मार्च 2025 पासून माथेरानमध्ये बेमुदत बंद जाहीर करण्यात आला आहे. माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीच्या तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत.
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना फसवून, त्यांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे. या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ही फसवणुकीची पद्धत बंद करण्यात यावी, त्यासाठी माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. येथील पर्यटन बचाव संघर्ष समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. या बंदला स्थानिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, सोमवारी १७ मार्च रोजी अधीक्षक कार्यालयात समितीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन स्थानिक पातळीवर करू शकले नाही. त्यामुळे पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवार १८ मार्च पासून बेमुदत बंद जाहीर केला आहे. Matheran Tourism Close |
त्यास येथील हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले असून जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात केलेल्या मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. Matheran Tourism Close |
कोणत्या आहेत मागण्या?
मिनी ट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते, अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून पर्यटकांची दिशाभूल करून जास्तीची रक्कम उकाळली जाते.त्यासाठी दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत.
या स्वरूपाची मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या २७ तारखेला मागणी केली होती. परंतु अनेक दिवस उलटूनही या स्थानिक प्रशासनाने उपाययोजना केली नसल्याने समितीकडून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.
हेही वाचा :
खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक पेज ‘हॅक’; नागरिकांना आवाहन करत म्हणाले…




