पिंपरी – महापालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने संबंधित विभागांना तातडीने कामकाम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जून महिन्याच्या आषाढीवारी पालखी सोहळा सन 2023 च्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उल्हास जगताप यांच्या विशेष उपस्थितीत दोन्ही संस्थानांच्या विश्वस्तांबरोबर बुधवारी (दि.17) आढावा बैठक झाली. यावेळी वाघ बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त विवेक पाटील, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रशांत लायगुडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन पवन नव्हाडे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थाचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, उत्तम माने, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त माणिक मोरे, पालखी सोहळा प्रमुख अनिल मोरे, भानुदास मोरे, संजय मोरे, विठ्ठल मंदिर आकुर्डीचे विश्वस्त माजी नगरसेवक गुलाब कुटे, प्रमोद कुटे, बाळासाहेब कुटे, सह शहर अभियंता ज्ञानदेव झुंजारे, संजय खाबडे, संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले आदी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी विविध पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडून बैठकीत माहिती घेऊन आढावा घेतला आणि पालखी दरम्यान योग्य बंदोबस्त आणि उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. संस्थानच्या वतीने सूचना पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय करावी, रस्त्यातील अतिक्रमणे दूर करावीत, पोलीस बंदोबस्तात वाढ व्हावी, पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, कार्डियाक ऍम्बुलन्सची सोय करावी, स्वागत कमानीवरील रंगरंगोटी व दिव्यांची दुरूस्ती करावी, वारकऱ्यांचे भिंतीचित्र खराब झाले आहे, त्यात सुधारणा करावी, स्नान पाण्याचे नियोजन करणे, पालखी पहाटे मार्गस्थ होत असल्याने रस्त्यावरील लाइट साडेसात पर्यंत चालू ठेवावे, पुरेशा टॅंकर पुरवठा आदी सूचना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्तांनी केल्या.