अयोध्येला जाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पेशल रेल्वे गाड्यांचे नियोजन

अयोध्या – रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहीले असून या सोहळ्याची प्रचंड वेगाने तयारी सुरू आहे. भाविकांना प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या धाम येथे भेट देता यावी यासाठी रेल्वेने आता विशेष रेल्वेगाड्या येथे पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
केवळ भारतच नाही तर श्रीरामावर श्रध्दा असणारे आणि विदेशात राहणारे असंख्य भाविक अयोध्येला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यांचा व देशाच्या विविध भागांत राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा याकरता देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पेशल गाड्या सोडल्या जाणार आहेत.
हिंदी पट्ट्यातील काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार एकट्या बिहारमधून 100 विशेष गाड्या चालविण्याची योजना आखण्यात आली आहे. छठ पूजेनिमित्त ज्या प्रकारे स्पेशल रेल्वेगाड्या दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, सुरत, मुंबई या शहरांतून चालविण्यात येतात, त्याचप्रमाणे रामलल्लाच्या दर्शनासाठीही एक वेळापत्रक आखण्यात आले आहे. यामुळे रामाच्या दर्शनाची ओढ असलेले लोक विनासायास रामनगरीत दाखल होतील.
30 डिसेंबरला अयोध्या धाम स्थानक आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय अयोध्या धाम विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर आता रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी सुरू आहे. भाविकांना सहज दर्शन कसे घेता येईल, याबाबत रेल्वेमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. त्याचबरोबर अयोध्येत भाविकांना राहण्यासाठी श्रीराम मार्गावर तीन मजली भव्य धर्मशाळा बांधण्याची तयारी आहे. येथे हजारो लोकांची राहण्याची सोय आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत 22 जानेवारीला रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला येणाऱ्या विशेष गाड्यांचा निर्णय घेण्यात आला होता. त्या ट्रेन्स अयोध्येत थांबणार नाहीत. तिथून पुढे जाताना दिल्ली, लखनऊ, वाराणसी, गोरखपूरसह जवळपासच्या स्थानकांवर थांबतील.





