Plane Crash: रशियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळून भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Plane Crash:

Plane Crash: जगभरात विमान अपघातांच्या घटनांचे सत्र सुरूच असताना सोमवारी रशियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. रशियाच्या ओरेंबुर्ग प्रांतातील ओरस्क शहराजवळील जानातालाप वस्तीजवळ एका प्रशिक्षणार्थी विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानात सवार असलेल्या तिन्ही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून रशियाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात यामुळे शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे होते. अपघाताच्या वेळी विमानात एक वरिष्ठ प्रशिक्षक पायलट आणि दोन कॅडेट्स (प्रशिक्षणार्थी विद्यार्थी) सवार होते. विमानाचा पाडाव इतका भीषण होता की जमिनीवर आदळताच विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. दिलासादायक बाब म्हणजे क्रॅश झाल्यानंतर विमानाला आग लागली नाही, मात्र आघाताची तीव्रता मोठी असल्याने तिघांचाही जागीच प्राण गेला.
First image from Russia’s Orsk plane crash
The aircraft was a university trainer, on board were two cadets and the pilot teaching them to fly
All three lives were lost pic.twitter.com/EuxKJhzb0i
— RT (@RT_com) February 2, 2026
या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून रशियन तपास यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. विमानातील तांत्रिक बिघाड, उड्डाणादरम्यानची हवामानाची स्थिती किंवा वैमानिकाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी (ATC) झालेला संवाद यांसारख्या विविध पैलूंची तपासणी केली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की मानवी चुकीमुळे, याचा शोध आता ब्लॅक बॉक्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे घेतला जाणार आहे.





