Shikrapur : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या सुविधांचे नियोजन करा
Shikrapur : विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आयोजित या बैठकीत चर्चेवेळी येणाऱ्या बांधवांसाठीचे वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, प्रशस्त वाहनतळ व्यवस्था, व्ही.आय.पी मार्ग, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका, आरोग्य व्यवस्था, बॅरिकेड्स, स्वागत व विश्रांती मंडप, बुक स्टॉल, हिरकणी कक्ष यासह नियोजनाचाही आढावा घेण्यात आला आहे.

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमासह पेरणेफाटा (ता. हवेली) येथे १ जानेवारी २०२७ रोजी जयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारीतील साधन सुविधांचे काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी केले आहे.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी शौर्य दिनी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करुन उत्तम सेवा सुविधा पुरवण्यासाठी आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक प्रांताधिकारी माने यांनी स्वतः विजययस्तंभ परिसराची बारकाईने पाहणी करीत सुविधा व व्यवस्थेचा आढावा घेवून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
यावेळी बार्टीच्या निंबंधक डॉ. सुचिता शिंदे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, शिरुरचे गटविकास अधिकारी महेश डोके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पाटील, पीएमपीएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, लोणीकंदच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवासंघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेना प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे, पांडुरंग गायकवाड उपस्थित होते.
सर्व घटकांचा आढावा
विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आयोजित या बैठकीत चर्चेवेळी येणाऱ्या बांधवांसाठीचे वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, प्रशस्त वाहनतळ व्यवस्था, व्ही.आय.पी मार्ग, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका, आरोग्य व्यवस्था, बॅरिकेड्स, स्वागत व विश्रांती मंडप, बुक स्टॉल, हिरकणी कक्ष यासह नियोजनाचाही आढावा घेण्यात आला आहे. प्रत्येक विभागाने आपापल्या विभागाच्या अखत्यारीतील साधन सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यासाठी आवश्यक निधी व परवानग्याबाबतही वेळेत संबंधितांशी पाठपुरावा करावा, असे आवाहन माने यांनी केले.
विजयस्तंभाची डागडुजी तातडीने करा
कोरेगाव भीमा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिल्याच्या शताब्दीवर्षानिमित्त यावर्षी अधिकच्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरुन प्रभावी नियोजन करावे. १०० कोटींचा निधी वर्ग करुन विजयस्तंभ परिसराच्या विकास आराखड्याला गती द्यावी, विजयस्तंभाची डागडुजी तातडीने करावी व स्थानिकांना विश्वासात घेवून अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करावे यासह विविध मागण्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवासंघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेना प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे व पांडुरंग गायकवाड यांनी केल्या आहे.





