आळंदी कार्तिकी यात्रेचे योग्य नियोजन करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

पुणे – आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता, आपत्तीव्यवस्थापन, महावितरण, पोलीस आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. नदीमध्ये सध्या असलेले अस्वच्छ पाणी वाहून जावे, यासाठी यात्रेस प्रारंभ होण्यापूर्वी तीन दिवस अगोदरपासून वडिवळे धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असेही डॉ. देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
पोलीस विभागाने गर्दी नियंत्रण तसेच अनुचित दुर्घटना घडू नये याठी उपाययोजना कराव्यात. वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी वाहतूक वळविण्याबाबतचे आदेश त्वरित निर्गमित करावेत. नदीमध्ये स्नान करणारे भाविक पाहता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पथके तसेच आवश्यक संख्येने बोटी तैनात ठेवाव्यात. आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपली अग्निशमन वाहने सतर्क ठेवावीत, आदी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायचे प्रतिनिधी उपस्थित होते.





