अंबानींच्या घरावर हेलिपॅड करण्यासाठीच स्फोटक ठेवली; मंत्र्याचा हात असल्याचा ‘मनसे’चा आरोप

मुंबई – उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं असलेली कार आढळून आल्यापासून राज्याचं राजकारण तापलं आहे. याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असून महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेलं आहे. मुकेश अंबानी यांच्यासाठी स्फोटकांचं नाटक केल्याचा आरोप याआधी काँग्रेसने केला होता. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून, की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा तपास होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे. हा हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोपच अविनाश जाधव यांनी केला.
अविनाश जाधव यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना झालेल्या अटकेवरून आणि त्यांच्या गाडीत आढळून आलेल्या पैसे मोजण्याच्या मशिनवर प्रतिक्रिया दिली. गाडीत पैसे मोजण्याचे मशीन सापडणं, हे गंभीर प्रकरण आहे. संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.



