बंगळुरू :– प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल 10) शुक्रवारी झालेल्या 12व्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगळुरु बुल्सचा 38-31 असा पराभव करून दबंग दिल्लीने यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, बुल्सचा हा या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. दिल्लीच्या विजयात कर्णधार नवीन कुमारने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
दबंग दिल्लीसाठी चढाई करताना, नवीन कुमारने पीकेएलमधील सलग दुसरा सुपर-१० सह १२ रेड पॉइंट मिळवले. बचावात विशाल भारद्वाज आणि हिम्मत यांनी प्रत्येकी तीन टॅकल पॉइंट घेतले. बंगळुरू बुल्ससाठी, भरतने चढाईत १२ टॅकल पॉइंट घेतले आणि अमनने बचावात तीन टॅकल पॉइंट घेतले.
दिल्ली के मुंडों ने दर्ज की दबंग जीत 🔥
तूफानी प्रदर्शन ने उड़ाए बुल्स के होश 🤩
फाइनल स्कोर 👉 31-38#ProKabaddi #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #BLRvDEL #BengaluruBulls #DabangDelhiKC pic.twitter.com/baijUCvsQ0
— ProKabaddi (@ProKabaddi) December 8, 2023
दबंग दिल्लीने पहिल्या हाफनंतर १७-१२ अशी आघाडी घेतली. दिल्लीचा कर्णधार नवीन कुमारने त्याच्या पहिल्याच चढाईत दोन गुण मिळवले आणि दरम्यान बंगळुरूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्लीच्या जबरदस्त बचाव आणि चढाईसमोर त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे सामन्याच्या १२व्या मिनिटाला बंगळुरूचा संघ प्रथमच ऑलआऊट झाला. दिल्लीने आपली आघाडी कमकुवत होऊ दिली नाही. त्यानंतर अमनने आशूवर सुपर टॅकल करून बंगळुरू संघाला दिलासा दिला आणि यामुळे दोन्ही संघांमधील गुणफरक काही प्रमाणात कमी करण्यात तो यशस्वी ठरला.
बंगळुरू बुल्सने दुस-या हाफची शानदार सुरुवात केली. परंतू पुन्हा एकदा दिल्लीचा पलटवार दिसून आला आणि त्यांनी बुल्सवर दबाव आणण्यास सुरुवात केली. नवीनने आपला सुपर १० देखील पूर्ण केला आणि त्यामुळे ३०व्या मिनिटाला बुल्स दुसऱ्यांदा ऑलआऊट झाली. भरतने आपल्या संघासाठी पुनरागमन केले आणि यादरम्यान जबरदस्त सुपर रेड करत सुपर-१० पूर्ण केला.
दिल्ली दडपणाखाली असताना नवीनने बहुगुणित चढाई करत संघाची आघाडी वाढवली. दिल्लीच्या बचावफळीने महत्त्वाच्या वळणावर प्रथम सुशील आणि नंतर भरतला चकवून सामन्यात आपली स्थिती मजबूत केली. शेवटी, दबंग दिल्लीने हा सामना सहज जिंकला आणि पीकेएल-१० मध्ये आपले खाते उघडले.