नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका मार्चपासून द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत. आतापर्यंत वाटाघाटीच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या महिन्यांत सहाव्या फेरीसाठी भारताला भेट देणारा अमेरिकन संघाने आपला दौरा पुढे ढकलला आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. तसेच भारताकडून मुक्त व्यापार करारासाठी अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पियुष गोयल म्हणाले, व्यापार करारासाठी युरोपियन युनियनशीही वाटाघाटी सुरू आहेत. याशिवाय न्यूझीलंडशीही व्यापार करारासंदर्भात चर्चा करत आहे. भारताने मॉरिशस, यूके, यूएई आणि ऑस्ट्रेलियासोबत आधीच व्यापार करार केले आहेत. तसेच आम्ही लवकरच ऑस्ट्रेलियासोबत व्यापार कराराचा दुसरा टप्पा पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलियाने २०२२ मध्ये अंतरिम व्यापार करार लागू केला आहे आणि आता त्याची व्याप्ती व्यापक व्यापार करारात वाढवण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. ओमानसोबतही लवकरच व्यापार करार जाहीर होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याची घोषणा दोन्ही देशांनी फेब्रुवारीमध्ये केली होती.