कराड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासवडे टोलनाका येथे पोलिसांनी राबविलेल्या वाहन तपासणी विशेष मोहिमेत 1 लाख 90 हजार रुपयांची रोकड आणि एक पिस्टल आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.
पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सुचनेनूसार डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका येथे सोमवारी सायंकाळी 5 ते रात्री 8 या दरम्यान वाहन तपासणीची विशेष मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान टोलनाक्यावरील दोन्ही लेनवर डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या उपस्थितीत अधिकारी व सुमारे 40 कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वाहनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास एका वाहनामध्ये पोलिसांना 1 लाख 90 हजारांची रोकड आणि गाडीतील एकाकडे पिस्टल सापडले. त्या पिस्टलचा परवाना संबंधिताकडे होता. ती रोकड आणि पिस्टल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आले. भरारी पथक चौकशी करुन रोकड आणि पिस्टलबाबत निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उंब्रज येथे 4 लाख 90 हजार, तर कराड मार्केट यार्ड येथे 1 लाख 75 हजारांची
रोकड वाहन तपासणीवेळी सापडली होती. निवडणुकीच्या अनुषंगाने गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.